मुंबई, 28 जून : मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावतीने आज अ‍ॅड.संदीप देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनोद पाटील यांनी हे कॅव्हेट दाखल केलं आहे.
मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयानं हे आरक्षण वैध ठरवलं आहे. पण मराठा आरक्षणाला विरोध असणारे अ‍ॅड. सदारत्न गुणवर्ते हे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच यावेळी गुणरत्ने यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

'हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबतचा निकाल घटनाबाह्य असून तो दबावाखाली दिला गेला आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि इतर मराठा संघटनांकडून माझ्या जीवाला धोका आहे. उद्या माझं काही बरं वाईट झाल्यास त्याला नांगेर पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,' असा धक्कादायक आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
राज्य सरकारनं मराठा समाजासंदर्भातील कोर्टात सादर केलेला अहवाल हा बोगस असल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याआधीच केला आहे. मराठा समाजामध्ये 90 टक्के मागासलेपण कसं असू शकतं? असंही त्यांचं म्हणणं आहे.
काय आहे कोर्टाचा निर्णय?
मराठा आरक्षण न्यायालयात टिकलं आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण वैध आहे. पण, 16 टक्के आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाची मर्यादा 12 ते 13 टक्के आणली पाहिजे, असा कोर्टानं सांगितलं आहे. हा निर्णय म्हणजे मराठा आंदोलनाचा विजय असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच दुसरीकडे 'राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकतं,' असा महत्त्वाचा निर्णय देखील मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. हा निर्णय आल्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours