मुंबई, 23 जून : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीची मुंबईत आज बैठक होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीत मराठवाडा विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभागात राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. उस्मानाबाद, परभणी, बीड लोकसभा मतदारसंघात पक्षाची ताकद असून पक्षाला लोकसभेला यश मिळवता आलं नाही. त्यातच बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षातील अंतर्गत कलहावर टीका करत शिवसेनेत प्रवेश केला. आता राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.
मराठवाड्यासाठी काय असणार रणनीती?
लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची जास्त वाताहत झाली. मराठवाड्यातील परभणी, उस्मानाबाद, बीड या मतदारसंघात राष्ट्रवादीला विजय मिळवता आला नसला तरीही चांगली मतं मिळवण्यात मात्र यश आलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेससोबत आघाडी करताना जास्तीच्या जागा घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असू शकतो.
युतीचीही जोरदार तयारी
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता दोन्ही पक्षांच्या आमदारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक होणार आहे. विधानभवनात होणाऱ्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील रणनीतीवर हे दोन्ही नेते सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours