मुंबई, 23 जून : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधीही काँग्रेसला अनेक धक्के बसताना दिसत आहेत. कारण अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. अशातच आता काँग्रेसचे विदर्भातील नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती आज रविवारी दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. दुष्यंत यांच्या प्रवेशाने विदर्भात शिवसेनेला बळ मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या प्रवेशाआधारे शिवसेनेनं विदर्भात भाजपला शह दिला का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी?
लवकरच हाती शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असलेले दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्य आहेत. तसंच ते नागपूर येथील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा संचालकदेखील आहेत. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे नागपूर आणि मुंबईत मिळून एकूण 28 शाळा महाविद्यालये असून यात 2 हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर 20 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत.
सतीश चतुर्वेदी आणि काँग्रेस
विदर्भातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. शहर काँग्रेसने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरणही मागितलं होतं. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळं काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours