रिपोर्टर.. परदेशी
वरठी। वरठी येथील सनफ्लॅग कारखान्यातील शेकडो कंत्राटी कामगारांना व्यवस्थापनाने कमी केले आहे. काही दिवसांपासून कारखान्यातील देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने उत्पादन बंद आहे. त्यामुळे कामगारांना घरी बसविण्यात आले आहे. व्यवस्थापनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये असंतोष दिसून येत आहे.

वरठी येथील सनफ्लॅग स्टील कारखान्यात जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कामगार कंत्राटी तत्वावर काम करीत आहेत. जिल्ह्यात रोजगाराला पर्याय नसल्याने याच कारखान्यात शेकडो कामगार १५ ते २० वर्षांपासून मिळेल त्या मजुरीवर कामावर आहेत. या कारखान्यात कायमस्वरुपी कामगार कमी तर कंत्राटी कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या कारखान्यातून उत्पादनाची अर्धी भिस्त कंत्राटी कामगारच सांभाळतात. अशा या कंत्राटी कामगारांना अचानकपणे कमी करण्यात आले आहे. सध्या या कारखान्यातून उत्पादन घेणे बंद आहे. कारखान्यातील बायलर बंद आहे. कारखान्यात देखभाल दुरुस्तीसाठी बाहेरून एका टिमला पाचारण करण्यात आले आहे. कारखान्यातून उत्पादन बंद असल्याने कामगारांना बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात दुसरा मोठा कारखाना नसल्याने शेकडो कामगार याच कारखान्यात कामाला आहेत. या कारखान्याच्या भरवंशावरच अनेकांनी आपले संसार उभे केले आहेत. तर काही तरूण कामगार भावी संसाराची स्वप्ने बघत आहेत. या कारखान्यातून मिळणार्‍या मजुरीतून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. अशा स्थितीत कंत्राटी कामगारांना बंद करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करणार? असा प्रश्न कामगारांसमोर उभा आहे.

कायमस्वरुपी कामगारही सक्तीच्या रजेवर….
उत्पादन प्रक्रिया बंद असल्याने सनफ्लॅग व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांना घरी बसविले तर कायमस्वरुपी कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. काही कामगारांना ६-६ तर काहींना १५-१५ दिवसांच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. व्यवस्थापनाच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours