मुंबई:  सुरुवातीला आलेला पाऊस, नंतर पडलेला उष्मा, दमट वातावरण यामुळे मुंबईकर आजाराने हैराण झाले आहेत. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू असा पसरणाऱ्या आजाराना मुंबईला विळखाच घातला असून सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज असल्याच मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. पावसामुळे असणारा ओलावा, अस्वच्छता यामुळे हे आजार पसरतात. पाण्याचा योग्य निचरा करणं, स्वच्छता ठेवणं आणि आहारात योग्य बदल केला आणि काळजी घेतली तर या साथीच्या आजारापासून बचाव करता येतो.
मुंबईत ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये यावर्षी 70 टक्के वाढ झालीय. गेल्या आठ दिवसात रुग्णांची संख्या जास्त वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पाऊस न पडल्याने तापमानात झालेली वाढ या व्हायरलसाठी जबाबदार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. नेहमी तीन दिवसात बरा होणारा व्हायरल आता बरं  व्हायला आठ दिवसांचा वेळ घेतो.
लहान मुलं, गरोदर महिला आणि मधुमेहाचा रूग्णांना या वातावरणात मोठ्या प्रमाणात आजार होतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त रुग्ण असल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मधूकर गायकवाड यांनी दिलीय.
या रुग्णांमुळे महापालिकेच्या हॉस्पिटल्सवर ताण येतो. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारचे आजार पसरतात. मात्र आरोग्याच्या पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने सेवा अपुरी पडते त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. अस्वच्छता, जागोजागी असणारे खड्डे त्यात साचणारं पाणी, उघडी गटारं, अनाधिकृत झोपडपट्ट्या यामुळे अशा पसरणाऱ्या आजारांना आळा घालणं पालिकेच्या हाताबाहेर गेलं आहे.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours