जळगाव, 13 जुलै : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला मोठं यश मिळालं. याच यशाची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा असणार आहे. पण हे यश मिळवताना मुख्यमंत्री फडणवीस आपल्या राजकीय आयुष्यातील मोठी जोखीम पत्करणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही काळापासून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत. आपल्या मनातील खदखद त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नाराज खडसेंचं तिकीट भाजपकडून कापलं जाण्याची भीती कार्यकर्त्यांकडूनच व्यक्त केली जाऊ लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या संबंधांमध्ये गेल्या पाच वर्षात कटुता निर्माण झाली आहे. यातूनच मग भाजपच्या धुरीणांनी जाणीवपूर्वक जळगाव जिल्ह्यात खडसेंना शह देण्यासाठी गिरीश महाजन यांना ताकद दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे विधानसभेत खडसेंचं तिकीट कापून मुख्यमंत्री फडणवीस जोखीम पत्करणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभेतील तिकीटावर काय म्हणाले एकनाथ खडसे?
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी मनातील खदखद व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष तिकीट देवो अथवा न देवो जनता जनार्दन माझ्या पाठीशी असल्याचे खडसेंनी म्हटलं होतं. दुसर्‍या पक्षातील लोकांना मंत्रिपदाचे तिकीट देतात परंतु पक्षाकडून निष्ठावंतांची अवहेलना करण्याचे काम सुरू असल्याची घणाघाती टीका खडसे यांनी रावेरमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत केली. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र सुन्न झाले होते.
खडसेंचं तिकीट कापणं भाजपसाठी जोखीम का?
एकनाथ खडसे यांना मंत्रिपदापासून दूर करण्याचा मोठा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला. पण मंत्रिपदापासून दूर असले तरीही एकनाथ खडसे यांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रभर आहे. खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे खडसे यांना भाजपने दूर केल्यास हा वर्ग दुखावला जाऊ शकतो. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीत याचा भाजपला मोठा फटाक बसण्याची शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours