पुणे, 28 जुलै : राष्ट्रवादीतून सुरू असलेल्या आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीद्वारे धमकावलं जात आहे,' असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.
'सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी सुरू आहे. या फोडाफोडीसाठी अनेक सहकारी संस्थांसह बँकांचाही गैरवापर भाजपकडून होत आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'काही नेते सोडून गेल्याने आम्हाला फरक पडत नाही. मी याआधीही अशी परिस्थिती बघितली आहे. यातून कसा मार्ग काढायचा याची आम्हाला कल्पना आहे,' असंही शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
- पंढरपूरच्या कल्याणराव काळे यांना दबाव टाकून पक्षांतर करण्यास भाग पाडलं
- दौंडच्या राहुल कुल यांनाही याच पद्धतीने सुप्रियाविरोधात लोकसभा निवडणुकीत उभं राहण्यास भाग पाडलं
- छगन भुजबळ यांना विनाकारण तुरूगांत टाकलं
- भाजपचं सरकार विरोधकांना धमकावत आहे
- हसन मुश्रीफ यांनी पक्षांतराला नकार दिला म्हणूनच त्यांच्या घरावर छापे घातले गेले
- चित्रा वाघ मला भेटून गेल्या. माझ्या पतीच्या विरोधात केसेस आहेत. त्या सोडवण्याच्या बदल्यात मला पक्षांतर करावं लागत आहे, असं त्यांनी सांगितलं.
- फोडाफोडीसाठी सत्तेचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रातच नाहीतर कर्नाटकातही तेच झालं
- कायद्याचं राज्य आहे की नाही अशी शंका वाटावी अशी परिस्थिती
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours