सातारा, 1 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष सोडलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर खरमरीत टीका केली. या टीकेला आता शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'जितेंद्र आव्हाड किंवा इतर कोणीही मला माझा वारसा सांगू नये. मला माझा वारसा पूर्ण माहीत आहे,' असा पलटवार शिवेंद्रराजे यांनी केला आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडत भाजपचं कमळ हाती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निष्ठेच्या मुद्द्यावर शिवेंद्रराजेंवर निशाणा साधला. यावरूनच आता या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.
शिवेंद्रराजेंचा पलटवार
'आजपर्यंत पक्षात होतो तेव्हा वारसा दिसला नाही. मात्र पक्ष सोडताच त्यांना माझा कसा वारसा दिसू लागला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी किंवा कोणीही माझा वारसा काय आहे मला सांगू नये. मीदेखील राजकारणात जे काही मिळवलं ते संघर्ष करूनच मिळवलं आहे,' असं म्हणत शिवेंद्रराजेंनी आव्हाडांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
'शिवेंद्रराजे ज्या राजेंचा वारसा सांगतात त्या शिवाजीराजेंनी केवळ 16 मावळ्यांना घेऊन तोरणा जिंकला होता. प्रवाहाविरुद्ध पोहणारेच इतिहास रचतात. शिवेंद्रराजे हे शिवरायांचे वारसदार नसून राजेंचे खरेच वारसदार आम्ही आहोत. कारण प्रहाविरुद्ध जाऊन आम्ही सत्ता मिळवून दाखवू. शिवेंद्रराजेंना त्यांच्या मतदारसंघाची इतकीच काळजी होती तर त्यांना पाच वर्षात विधानसभेत किती प्रश्न विचारले हे साताऱ्यात सांगावं मी त्यांच्या पाया पडून माफी मागेल,' असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
Post A Comment:
0 comments so far,add yours