मुंबई, 22 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूकांची शनिवारी घोषणा केली. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली. याच पार्श्वभूमीवर सगळ्यात जिल्ह्यांत कडक कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनीही आचारसंहिता लागू होताच मोठी कारवाई केली आहे. तब्बल 67 लाख रुपये मुंबईच्या एलटी मार्ग परिसरातून जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
एका सामान्य दुकानातून एवढी मोठी रक्कम पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पैसे नक्की कोणाचे आहेत? एवढी रक्कम दुकानात कशासाठी ठेवण्यात आली? याचा आता पोलीस तपास करत आहेत. खरंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस खातं हायअलर्टवर असतं. अशात दुकानात मोठी रक्कम ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी दुकानावर धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी तब्बल 67 लाख रुपये जप्त केले आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेली रक्कम ही आयकर विभागाकडे पाठवण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर आयकर विभागाकडूनही नेमकी रक्कम कुठून पाठवण्यात आली आहे. याचा शोध सुरू आहे. या प्रकणात पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्याची कठोर चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
शनिवारी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे लगेचच आचारसंहित लागू झाली. पण पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांची प्रणिती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी मतदारांना मेकअप बॉक्स गिफ्ट म्हणून वाटले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार नरसय्या यांच्याकडून करण्यात आली. आडम मास्तरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली. त्यावर आता प्रणिती शिंदे यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours