कोल्हापूर, 8 सप्टेंबर : कोल्हापुरात पावसाचा जोर आजही कायम आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी 38.5 फुटांवर पोहोचली आहे. तर राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 11,396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच स्थानिकांनी योग्य वेळी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेल्यानं 20 मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या येथे तैनातदेखील करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली : नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस असल्यानं तिस-या दिवशीही पूरपरिस्थिती कायम आहे. पर्लकोटा आणि पामुलगौतम नद्यांना पूर आल्याने भामरागड गावात पुराचे पाणी शिरलं आहे. 70 टक्के भामरागड गाव पाण्याखाली गेलं आहे. वीज मोबाइलसेवाही पूर्णतः ठप्प आहे. भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेलाच आहे. या परिसरातची शनिवारी जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हेलिकॅप्टरने हवाई पाहणी केली. पाच तालुक्यांचा गडचिरोली आणि चंद्रपूरशी संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours