जळगाव, 8 सप्टेंबर : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. श्रीकांत ज्ञानेश्वर बहिरम (35 वर्ष)असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. बहिरम अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील रहिवासी होती. कर्जबाजारीपणाला कंटाळून श्रीकांत यांनी आपल्या शेतातच गळफास घेतला. गेल्या चार वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर खासगी सावकाराचे, सोसायटीचे कर्ज वाढले होते. यामुळे श्रीकांत नैराश्यामध्ये होते. यापूर्वीही त्यांनी शेतातील फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर त्यांनी शेतातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बहिरम यांच्या पश्चात एक 8 वर्षाचा मुलगा आणि एक 12 वर्षाची मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
दरम्यान, शेतात कीटकनाशकांची फवारणी करतानी विदर्भात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना अकोला जिल्ह्यातील आसेगाव बाजार येथे तर दुसरी घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरी पठार येथे घडली आहे. शेतात कीटकनाशकाची फवारणी करतानी एका तरुण शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील आसेगाव बाजार येथे घडली आहे. रणजीत दादाराव धांडे असे मृत शेतमजूराचे नाव आहे. 7 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रणजीत दादाराव धांडे हा तरुण शेतात पिकावर कीटकनाशक फवारणी करत होता. त्यातून विषबाधा झाली. त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रणजीतची प्राणज्योत मालवली. रणजीतच्या मृतदेहाचे रविवारी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला. याबाबत माहिती मिळेल, अशी माहिती सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे यांनी दिली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours