सांगली, 16 सप्टेंबर: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सांगलीत काँग्रेसला हादरा बसला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी सभापती, काॅग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. सत्यजित देशमुख आज महाजनादेश यात्रेदरम्यान कराडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असून ते काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शरद पवार यांच्यावर जोरदार टीका..
सत्यजीत देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. स्वार्थावर उभा राहिलेल्या राष्ट्रवादीची शकलं उडायली लागली आहेत. शरद पवारांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले, अशा शब्दात सत्यजीत देशमुख यांनी पवारांवर प्रहार केला आहे. दरम्यान,
आघाडीत शिराळा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता धूसर असल्याने सत्यजित देशमुख हे मागील काही दिवसांपासून दुसऱ्या पर्यायाच्या शोधात होते. सत्यजित देशमुख यांनी शिराळा येथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा घेतला. त्यात त्यांनी आपला भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात येत असून यावेळी देशमुख मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours