वसई, 16 सप्टेंबर:नालासोपारा विधानसभेचे शिवसेनेचे भावी उमेदवार प्रदीप शर्मा यांनी शिवसेना प्रवेशानंतर पहिल्याच एन्ट्रीला 2000 बाईक्स, 100 कार, 40 रिक्षा घेऊन विरार फाटा ते नालासोपारा (पच्छिम) अशी रॅली काढली. 'आम्ही दाऊदला मुंबई सोडायला लावली असून इथे कोण दादागिरी करेल, त्यालाही मुंबई सोडायला लावू', असा टोला प्रदीप शर्मा यांनी वसई-विरारमध्ये 28 वर्षांची एकहाती सत्ता असलेल्या आमदार हितेंद्र ठाकुराना नाव न घेता लगावला आहे.
येथे नळाला पाणी नाही तर लोकांच्या घरात येते...
विरारमध्ये एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. भरपावसात ही रॅली काढण्यात आली. येथे नळाला पाणी येत नाही तर लोकांच्या घरात पाणी येत असल्याचे शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रदीप शर्मा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते आगामी विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहेत. वसई-विरारमध्ये सर्व भूमिपुत्र एकत्र आले असून शर्मा यांचा विजय निच्छित असल्याचा दावा आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्धन पाटील यांनी केला आहे.
चोर की पोलिस?
नालासोपारा येथे माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसैनिकांची भेट घेण्यासाठी येत आहेत. परंतु,त्यांच्या दौऱ्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी शहरात अजब पोस्टर लागले आहेत. त्यामध्ये चोर की पोलिस असा सूचक प्रश्न विचारण्यात आला आहे. नालासोपाऱ्यात हे पोस्टर कुणी लावले याचा काहीच पत्ता नाही. परंतु, माजी पोलिस अधिकाऱ्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या तिसऱ्याच दिवशी हे पोस्टर लागल्याने ही टीका त्यांच्यावरच असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना आपला मुलगा मानत होते असे शर्मा म्हणाले. पोलिस सेवेत असताना जेव्हा-जेव्हा अडचणी आल्या त्यावेळी बाळासाहेबांनी आपली मदत केली असेही ते पुढे म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत प्रदीप शर्मा यांची बंदूक बोलायची. आता त्यांचे मन बोलणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours