नाशिक,20 सप्टेंबर:नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी मिसळ पार्टीचं आयोजन केल्याने युतीत ठसका उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या 'ठसकेबाज राजकीय मिसळ पार्टी'वरील स्पेशल रिपोर्ट....
मिसळ आणि नाशिक हे समीकरण तसं नवीन नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये सुरु असलेल्या राजकीय मिसळ पार्टीने नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांनी दावा केला आहे. एवढेच नाही तर मिसळ पार्टीच्या माध्यमातून विलास शिंदे यांनी भाजपला आव्हान देत प्रचार सुरू केला आहे. या मतदार संघातील जुन्या आणि नवीन शिवसैनिकांची मोट बांधण्यासाठी या मिसळ पार्टीच्या माध्यमातून 1 लाख शिवसैनिकांना शिवबंधन देखील बांधण्यात येत आहे.
विलास शिंदे हे शिवसेनेचे इछुक उमेदवार आहेत. विशेष म्हणजे युती आणि जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय झाला नसताना शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांच्या मागणीला बळ दिले आहे. या शिवाय नाशिक पश्चिम मतदार संघावर आजवर शिवसेनेचे कसे वर्चस्व राहिले आहे, याबाबत दाखले देत ही जागा भाजपने शिवसेनेला सोडावी, असा आग्रह देखील धरला जात आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांनी आयोजित केलेल्या या मिसळ पार्टीला शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री, संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते असे सर्वच पदाधिकारी अंतर्गत गटतट विसरून हजेरी लावत आहे. शिवसेनेच्या 'ठसकेबाज राजकीय मिसळ पार्टी'मुळे मात्र भाजप नेत्यांना ठसका लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours