मुंबई, 24 सप्टेंबर : संपूर्ण गणेशोत्सव पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. पण त्यानंतर गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरला आहे. अशात आता अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हिक्का असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चक्रीवादळाचा कोणताही धोका मुंबईला नसणार आहे.
हिक्का चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये मध्यम स्वरुपाचा तर कोकण आणि गोव्यात हलका पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 26 सप्टेंबरला मुंबई आणि गोवामध्ये चांगला पाऊस होणार आहे. मुंबईत पावसाच्या मध्यम सरी  कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही सखल भागांत पाणी साचेल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शांत झालेला पाऊस पुन्हा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरातमध्ये पावसाळी हालचाली सुरू झाल्या आहेत. गुजरातमधील अनेक महत्त्वाच्या भागांत पावसाची संततधार सुरू आहे. हिक्का चक्रीवादळ हे आणखी पुढे सरकेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा नगण्य परिणाम होईल. तर पुढच्या काही दिवसात दक्षिण गुजरातमध्ये आणखी एक चक्रीवादळ प्रणाली तयार होणार असल्याचा अंदाज आहे.
केरळमधील पावसाचा जोर कमी होणार
बंगालच्या उपसागरात मान्सून प्रणाली तयार होईल. त्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण द्वीपकल्पाकडे  सरकेल. कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्यामुळे केरळमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये चांगला पाऊस पडेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours