नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र आता या भेटीबाबत नवी माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आणावे, यासाठी भेट झाली असल्याची सूत्रांची माहिती. ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पोट निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. त्याप्रमाणे आता राष्ट्रवादीने आदित्य यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात भविष्यात काही नवी समीकरणं पाहायला मिळणार का, याची चर्चा रंगत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या नावाची आज होणार घोषणा

वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघात आज शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा होणार आहे. याच मेळाव्यात वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून युवासेनाप्रमख आदित्य ठाकरे यांचं नाव जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे निवडणुक लढवणारे पहिले ठाकरे ठरणार आहेत.

महालक्ष्मी रेसकोर्स जवळील लाला लाजपतराय काँलेजमधील सभागृहात हा शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा होणार आहे. या मेळाव्यात स्थानिक शिवसैनिकांच्या सहमतीने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभेची रंगत वाढण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours