मुंबई, 30 सप्टेंबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत पवार विरुद्ध फडणवीस असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत ईडीचं संकट परतावून लावल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला. पण त्यानंतर बारामतीत अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपने आता नवा डाव टाकला आहे.
वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर भाजपकडून अजित पवार यांच्याविरोधात बारामतीतून लढण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
पवारांविरोधात भाजप वापरणार 2014 चा 'लोकसभा पॅटर्न'
भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर तेव्हा विजयापासून दूर राहिले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती.
यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच भाजप त्यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours