बीड, 23 सप्टेंबर : बीडमध्ये शरद पवारांनी जयदत्त क्षिरसागर यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर आज जयदत्त क्षिरसागर यांनी टीकेला प्रत्युत्तर देत हल्ला चढवला आहे. 'पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरं फोडली. यात गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिलं. असं राज्यात अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. पवारांनी दुसऱ्याला आदेश देण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावं' असा सल्ला जयदत्त क्षिरसागर यांनी पवारांना दिला आहे. ते बीडमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, 'पक्षात असतानाच पवारांना विचारायचं होतं की 15 वर्षांत त्यांनी काय केलं. राष्ट्रवादीत माझी कोंडी केली होती. ते फोडण्याकरता मी सेनेत गेलो आहे. मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी जे काम या युती सरकारने केले ते काम आघाडी सरकारने केलं नाही.' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. दुर्दैवाने राष्ट्रवादीत मतभेद असायला पाहिजे होते मनभेद नाही. याकरणामुळे मोठ्या प्रमाणत लोक पक्ष सोडून चालले आहेत. याचं आत्मचिंतन पवारांनी करावं.' अशा शब्दात क्षिरसागर यांनी पवारांवर टीका केली आहे.
'भाकरी फिरावयची तर दुसरीकडे फिरवा. जिथे फिरवायची तिथे फिरवत नाहीत नको तिथे फिरवत बसतात. त्यामुळे राष्ट्रवादीवर ही वेळ आली आहे. कॉँग्रेस राष्ट्रवादीची घसरगुंडी थांबवणं अवघड आहे. लोकांमधे मानसिकता झाली. कार्यकर्ते नैराश्याने ग्रासले आहेत. पक्षांतर करणारे चौकशी किंवा पदाच्या आशेने जात नाहीत. हे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या त्रासाला कंटाळून चालले आहेत. यामुळे काळ ठरवेल चूक काय आणि बरोबर काय' असा टोलाही जयदत्त क्षिरसागर यांनी लगावला आहे.
दगाबाजी करू नका, आमचे उमेदवार तयार आहेत; शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
'युती करायची असेल तर लवकर करून टाका, नाहीतर आमचे उमेदवार तयार आहेत' असा थेट इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. खरंतर युती होणार हे 100 टक्के असलं तरी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही आहे. त्यामुळे उमेदवारांची नावं आणि कोणते मतदार संघ कोणाच्या पारड्यात असा संभ्रम आहे. या सगळ्यात शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा असल्यामुळे एकदा काय तो युतीचा निर्णय घ्या नाहीतर आमचे उमेदवार स्वबळावर लढणार असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours