31 ऑक्टोबर : काँग्रेसच्या विधिमंडळाच्या गटनेत्यांची निवड करण्यासाठी मुंबईत आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्य कार्यालयात काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त आमदारांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुरुवातीपासून काँग्रेस बॅकफूटवर दिसत होती. काँग्रेसमधून सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या पक्षांतराने तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर मोठा परिणामा झाला. अशा स्थितीतही काँग्रेसचे विधानसभेच्या निवडणुकीत 44 आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांची नावे काँग्रेस गटनेतेपदासाठी स्पर्धेत आहेत.
काँग्रेसच्या बड्या नेत्याला व्यक्त करावी लागली दिलगिरी
एकीकडे काँग्रेस गटनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारावरून थेट हायकमांडवर टीका केली होती. या वक्तव्याबाबत आता विजय वडेट्टीवार यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत नुकतीच विधानसभा निवडणूक आढावा बैठक झाली. या बैठकीत वड्डेटीवार यांनी हायकमांडबाबत व्यक्त केलेल्या मतांवरूनही चर्चा झाली. त्यानंतर वड्डेटीवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.
'हायकमांडने जास्त लक्ष दिले नाही त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा कमी आल्या,' अशी थेट टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती. वडेट्टीवार यांनी पक्षाच्या हायकमांडलाच टार्गेट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Post A Comment:
0 comments so far,add yours