नांदेड 01 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीचं जागावाटप जाहीर झाल्यानंतर आता बंडखोरीला उधाण आलंय. युतीचं जागावाटप जाहीर झालं आणि नाराजीचे सूर उमटले. लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का बसलाय. लोहा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडून भाजपला मिळेल अशी त्यांना आशा होती. त्या जागेवर आपल्याला मुलाला तिकीट देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र लोहा ही जागा शिवसेनेकडेच कायम असून तिथे उमेदवारही त्यांनी निश्चित केलाय. त्यामुळे संतापलेल्या चिखलिकर यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याची थेट धमकीच दिलीय. खासदार प्रताप पाटिल चिखलीकर हे 2019 पर्यंत शिवसेनेचेच आमदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदारही झाले. याचा शिवसेनेला राग आल्याचं बोललं जातं.
चिखलीकर यांनी सेनेशी गद्दारी केल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी सेनेने हट्टाने हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवला. शिवसेनेकडून लोह्यात मुक्तेश्वर धोंडगे यांचं तिकीट निश्चित मानलं जातंय. शिवसेनेने केवळ मी भाजपमध्ये गेल्याने आपल्या मुलाचा पत्ता कापला असेल तर शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच प्रताप पाटील चिखलिकर यांनी दिलाय.
मुलगा प्रविण चिखलीकर यांना या जागेवरून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. आता चिखलिकर समर्थक खवळले असून लोह्यामधून प्रविण चिखलिकर यांनी अपक्ष म्हणून लढावं अशी मागणी केलीय. असं असेल तर शिवसेनेचे जिल्ह्यात प्रचंड नुकसान होणार असल्याची धमकीच खा. चिखलीकरांनी दिलीय. त्यामुळे नांदेडमध्ये आता चिखलीकर विरुध्द शिवसेना असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours