मुंबई 28 ऑक्टोंबर : राजकारणात पुन्हा संधी केव्हा मिळेल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे जे मिळवायचं ते आताच मिळवा. कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका असा सल्ला काँग्रेसच्या तरुण नेत्याने आदित्य ठाकरेंना दिलाय. सत्तेतल्या वाटणीवरून सध्या भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच आणि दबावाचं राजकारण सुरू आहे.  मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष मिळावं यावर शिवसेना ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना हा सल्ला Facebook पोस्ट लिहून दिलाय. काँग्रेसच्या या युवा नेत्याने एक मित्र म्हणून दिलेला सल्ला राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलाय.

सत्यजित तांबे यांनी अडीच अडीच वर्षाच्या निमित्ताने... असं शिर्षक देत एक Facebook पोस्ट लिहून आणि स्वत:चा अनुभव शेअर करत आदित्य ठाकरेंना सल्ला दिलाय. सत्यजित तांबे लिहितात, प्रिय आदित्यजी, 2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी 'अध्यक्ष' व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.

मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, 'सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल'. पुढे सर्व जिल्हा मला 'भावी अध्यक्ष' म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या. पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours