औरंगाबाद,19 ऑक्टोबर:कन्नड मतदार संघातील शिवस्वराज्य पक्षाचे नेते आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमने पाठिंबा दर्शवला आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी किराडपुरा येथील सभेत हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
उद्धव ठाकरेंवरील 'ती' टीका आली अंगलट
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात कन्नड पोलिस ठाण्यांमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आता हर्षवर्धन जाधव यांच्या अंगलट आले आहे. हर्षवर्धन जाधवांच्या त्या कथित वक्तव्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहिता प्रमुखांकडे तक्रार करण्यात आली आहे. आचारसंहिता पथकप्रमुख राममहेंद्र डोंगरदिवे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 188 प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीची टीका..
हर्षवर्धन जाधव यांनी तीन दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत उद्धव ठाकरेंवर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. तेव्हापासून ते शिवसैनिकांच्या रडारवरही आले आहेत. नगरसेवक राज वैद्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्षवर्धन जाधव यांच्याविरूद्ध औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours