औरंगाबाद: चारित्र्यावरून संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्ना पंडित बिरारे (वय-45) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीने रत्नाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या रिकाम्या ड्रममध्ये लपवून तो फरार झाला आहे. चोवीस तासांनंतर दुर्घंधी पसरल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मिळालेली माहिती अशी की, रत्ना व पंडित हे दाम्पत्य शहरातील आरेफ कॉलनीत इसरार शेख यांच्याकडे कामाला होते. शेख यांनी त्यांच्या बंगल्यातच या दाम्पत्याला राहण्यासाठी दोन खोल्या दिल्या होत्या. शुक्रवारी सकाळपासून दोघेही कामावर गेले नाही. शेख यांनी त्यांच्या खोलीकडे जाऊन पाहिले असता खोलीला कुलूप दिसले. त्यांनी रत्नाच्या मोबाइलवर कॉल केला असता तोही बंद येत होता. संध्याकाळी त्यांनी रत्ना यांच्या भावाशी संपर्क साधून दोघेही काहीही न सांगता कुलूप लावून निघून गेल्याचे सांगितले. रत्नाचे भाऊ तातडीने इसरार शेख यांच्याकडे पोहोचले. त्यांनी बिरारे दाम्पत्याच्या खोलीचे कुलूप तोडून घरात पाहिले. मात्र, रत्ना व पंडित दोघेही आढळून आले नाही. नंतर रत्नाचे भाऊ घरी निघून गेले. शनिवारी सकाळी त्यांच्या खोलीच्या आजूबाजूला प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे इसरार शेख यांनी पाण्याच्या ड्रममध्ये पाहिले असता त्यात रत्नाचा मृतदेह बसलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार पाहून शेख यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ रत्ना यांचे माहेरी व बेगमपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह घाटी रुग्णालयात नेला. चारित्र्याच्या संशयावरून पंडित याने पत्नीची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस पंडितचा शोध घेत आहेत. बिरारे दाम्पत्याला तीन मुली असून त्या विवाहित आहेत. पंडित व रत्ना यांच्यात कायम वाद होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours