कोल्हापूर, 16 मार्च: कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्ती 15 तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये दाखल झाली होती. सर्व चाचण्या झाल्यानंतर रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून मृत्यूचं नेमकं कारण काय असावं याचा डॉक्टर शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे रक्ताचे नमुने टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवले होते. आज अहवाल येणार होता. पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला. खरंतर कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे आजाराची लागण झाल्याच्या धक्क्यामुळे व्यक्तीचा जीव गेला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती मूळची हरियाणामधील असून कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं राहायची. 8 मार्च ते 15 मार्च संशयित रुग्णाने हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता. त्यानंतर नागाव इथं परतल्यानंतर व्यक्तीला आजार सुरू झाला. कोरोना झाल्याची लक्षणं दिसू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण अहवाल येण्याआधीच व्यक्तीचा मृत्यू झाला.
दरम्यान, डॉक्टरांनी व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला असून त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
काल रात्री पिंपरी चिंचवड येथील 5 आणि आज सकाळी औरंगाबाद येथील 1 रुग्ण कोरोनाबाधित आला. तसंच सायंकाळी पिंपरी चिंचवडमधीलही एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 33 झाली असून औरंगाबाद मधील रुग्णालयात भरती असलेल्या 59 वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. तिची प्रकृती स्थिर आहे.
राज्यात आज 95 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. 15 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 584 विमानांमधील 1 लाख 81 हजार 925 प्रवासी तपासण्यात आले आहेत.
राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण 1043 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 759 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 669 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 33 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यातील विविध विलगीकरण कक्षामध्ये 75 संशयित रुग्ण भरती आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
पिंपरी चिंचवड मनपा - 9 रूग्ण, पुणे - 7, मुंबई - 5, नागपूर - 4, यवतमाळ - 2, रायगड, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी एक असे एकूण 33 रूग्ण आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours