मुंबई, 26 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे. असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून त्यांची केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे.
याच भागात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 122 रुग्ण आहेत. म्हणजे प्रत्येकी पाचवा रुग्ण हा राज्यातील आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाव्हायरसची एकूण आकडेवारी जारी केली आहे. एकूण 606 प्रकरणांपैकी 553 प्रकरणं अॅक्टिव्ह आहेत, तर 42 रुग्ण बरे झालेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळलेत. यामध्ये मुंबईत 9, ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर सांगलीत एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. तर राज्यातील पहिले 2 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours