मुंबई, 27 एप्रिल : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाशी लढा देत असताना मुंबईत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलीस आपलं कर्तृव्य चोखपणे पार पाडत आहे. परंतु, एका चोराला पकडल्यामुळे मुंबई पोलिसांसोबत एक विचित्र प्रसंग घडला आहे.
मुंबईत चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका 22 वर्षीय तरुणामुळे तब्बल २० पोलिसांनी क्वारंटाइन होण्याची वेळ आली. गोरेगाव पश्चिम येथून एका चोराला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली होती. या चोराला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयाने पोलीस कोठडी केली होती. त्यानंतर या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
त्यामुळे त्या चोराला ठाणे कारागृहात नेण्यात आले. पण तिथे जागा नसल्यामुळे या चोराला तळोजा कारागृहात  नेण्यात आले. मात्र, तळोजा जेलमध्ये आत नेण्याआधी तळोजा जेलच्या अधिकाऱ्यांनी चोराची कोरोना चाचणी झाली आहे का? अशी विचारणा केली.
त्यानुसार, पोलिसांनी या चोराला पुन्हा मुंबईत आणलं आणि जे जे रुग्णालयात या चोराची कोरोना चाचणी घेण्यात आली. धक्कादायक म्हणजे, या चोराचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. चोराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.  बांगूर नगर पोलिसांच्या पाया खालची जमीनच सरकली.
आता  या चोराला वेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर चोर पोलीस कोठडीत होता. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जे जे पोलीस कर्मचारी हजर होते त्या सर्व 20 पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
कल्याण आणि तळोजा कारागृहात नेत असताना जे जे  पोलीस वाहनात होते, त्यांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अशा एकूण 20 पोलिसांना एका चोरामुळे 14 दिवस क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या इतरही लोकांच यादी काढण्यात आली असून तपासणी केली जाणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours