डोंबिवली, 05 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबईचं उपनगर असलेल्या डोंबिवलीमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. ही घटना ताजी असतानाच रुग्णालयातून क्वारंटाउन केलेला रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
डोंबिवली आणि परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबईत नेण्यास विलंब होत होता. त्यामुळे शहरातील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, शनिवारी रात्री शास्त्रीनगर रुग्णालयातून एक क्वारंटाइन व्यक्ती पळून गेल्याची घटना समोर आली. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानं या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. रुग्णालयातच या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं.
परंतु, शनिवारी रात्रीही ही व्यक्ती रुग्णालयातून पळून गेल्यामुळे प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. असंही सांगितलं जात आहे की, रुग्णालयामध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याने आणि चांगली सोय नसल्याने ही व्यक्ती पळून गेली असावी अशी चर्चा आहे. या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एका लग्न सोहळ्यात परदेशातून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने हजेरी लावली होती. या तरुणामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या मित्रालाही लागण झाल्याचं समोर आलं होतं. तसंच महापौरांसह अनेकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं.
डोंबिवली आणि कल्याणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही 21 वर
दरम्यान, डोंबिवलीत आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. एक रुग्ण हा पूर्व भागातला आहे. तर दुसरा रुग्ण हा पश्चिम भागातला असून दोन्ही रुग्ण हे महिला आहे. या महिलांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची यादी तयार करण्यात आली असून तपासणी करण्यात येणार आहे.
तसंच या महिला ज्या परिसरात राहत होत्या तो परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. शुक्रवारपर्यंत डोंबिवली आणि कल्याण परिसरात कोरोनाबाधितांची संख्या ही 21 वर पोहोचली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours