मुंबई: राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे राजस्थान सरकारच्या संपर्कात असून या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून महाराष्ट्रात आणले जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी एसटीच्या काही विभागातील चालकांना या स्पेशल ड्युटीसाठी बोलावण्यात आल्यानं त्या चालकांच्या कुटुंबाने मात्र चिंता व्यक्त केली आहे. कोटा येथून हे विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन होणार आहे, अशी देखील माहिती आहे.
सरकारने कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याबाबत घोषणा केली होती. मात्र त्यांना आणणार कसं? याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता महाराष्ट्राची लालपरी या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धावणार असल्यानं पालकांची बऱ्याचअंशी चिंता मिटली आहे. आता या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटीच्या साधारण 90 बसेस धावण्याची शक्यता आहे. लांबचा प्रवास असल्यानं एका चालकावर ताण येऊ नये यासाठी एका बससाठी दोन चालक राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार कोटा इथे असलेल्या काही विद्यार्थी वाहनांची व्यवस्था केली होती. त्यांना प्रवासासाठी परवानगी हवी होती. राज्य सरकारने ती परवानगी मिळवून दिली आहे. त्यामुळे वाहनांची व्यवस्था असलेले काही विद्यार्थी कोटा इथून निघाले आहेत. हे विद्यार्थी थेट त्यांच्या जिल्ह्यात येतील. इतर विद्यार्थ्यांसाठी राज्यातून एसटीच्या बसेस जाणार आहेत. ह्या बसेस विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहेत तिथे त्यांना सोडणार आहेत.
आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेच्या तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटा येथे शिकायला गेलेल्या जवळपास दीड हजार ते दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत संपणार होता. त्यावेळेस या विद्यार्थ्यांना 14 एप्रिलपर्यंत येथेच राहा, मग पुढे पाहू, असे तेथील शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. यानुसार हे विद्यार्थी तेथेच थांबले. मात्र पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चा केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours