पुणे, 29 एप्रिल : पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. दरदिवशी रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र अशातच पुण्याच्या ससून रुग्णालयातून एक 'गुड न्यूज' आली आहे. ससून रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरावरून टीका होत असताना याच ससूनमध्ये एका अवघ्या चार महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनावर मात केली आहे.
आजोबांपासून लहान बाळाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या बाळाला उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आलं. कोरोना हा रोग तसं पाहिला गेलं तर ज्येष्ठ नागरिक आणि लहान बाळांसाठी सर्वाधिक घातक मानला जातो. मात्र ससूनच्या बालरोग विभागातील डॉक्टरांच्या प्रयत्नाना मोठं यश आलं आहे. कोरोनाला हरवून चार महिन्यांचा चिमुकला जीव सुखरूप बाहेर पडला आहे.
दरम्यान, आधी कोरोना झालेल्या एकूण 9 रुग्णांना काल ससूनमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये 9 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. आधीच कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या मृत्यूसंख्येमुळे बदनाम झालेलं ससून रुग्णालयाने आता मात्र चिमुकल्याला कोरोनापासून दूर करण्यात यश मिळवलं आहे.
दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 122 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. त्यामुळे एकट्या पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 1339 वर जाऊन पोहोचली आहे, तर जिल्ह्यात हीच आकडेवारी 1491 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात आणखी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांचा आकडा 79 तर जिल्ह्यातली मृतांची संख्या 83 वर गेला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours