- दुग्ध विकास मंत्री सुनील केदार
शासन हमी भावाने खरेदी करणार
प्रोटीनयुक्त आहार घ्या, चिकनपासून कोरोना नाही
जिल्हा प्रतिनिधि शमीम आकबानी
भंडारा, दि.31 : प्रतिबंधात्मक कारवाईच्या काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होणाऱ्या दुध उत्पादनास मागणीच्या अभावाने अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी व कष्टकरी अडचणीत सापडला आहे. दुध उत्पादक संघांनी ठरवलेल्या हमी भावातच शेतकऱ्यांकडून दुध विकत घेण्यात यावे. हमी भावापेक्षा कमी दराने दुध खरेदी करणाऱ्या खाजगी व सहकारी संस्थांवार आपत्ती व्यस्था कायदयाअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट ईशारा पशूसंवंर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिला.
जिल्हा दुध उत्पादक संघाकडे शिल्लक राहीलेले शेतकऱ्यांचे दुध राज्य शासन खरेदी करणार असून महानंदाच्या माध्यमातून राज्यात आवश्यक दुधाचा पुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यातील एकाही शेतकऱ्यांकडे दुध शिल्लक राहाणार नाही याची खबरदारी शासन घेणार आहे. दुधापासून भुक्टी बनविण्याचा कारखाना शासन सुरु करणार असून यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे दुध शासन हमी भावाने खरेदी करेल असे केदार यांनी सांगितले. दुध घेणाऱ्या खाजगी सहकारी व शासकीय संस्थांना राज्य शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दराने दुध खरेदी करता येणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा राज्य शासनाने निर्णय केला असून शेतकऱ्यांचे दुध शासन हमी भावाने खरेदी करणार असल्याचे केदार म्हणाले.
प्रोटीनयुक्त आहार घ्या
आहारात योग्य प्रमाणात प्रोटीनचा समावेश असल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते, त्यामुळे नागरीकांनी दुध, अंडी, दुग्धजन्य पदार्ध तसेच चिकनचा समावेश आहारात करावा असे आवाहन केदार यांनी केले.
अंडी-चिकनच्या सेवनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही
अंडी-चिकनच्या सेवनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नसून आरोग्यासाठी चिकन अतिशय उपयुक्त आहे. याबाबत समाजमाध्यमावरुन पसरविण्यात आलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आपल्या आहारात दुध, अंडी, चिकन व डाळींचा अधिक प्रमाणात वापर करावा. याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन आयुक्त तसेच दुग्ध आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा, असे केदार यांनी सांगीतले.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे महत्वाचे साधन म्हणजे शरीराला लागणारी पोषणद्रव्ये. यापैकी शरीरात असलेली प्रथिनांची (प्रोटीन) मात्रा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. आहारातील दुध, अंडी, चिकन, दाळी या वस्तूंमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. शरीरासाठी आवश्यक प्रथिनांची पूर्तता झाल्यामुळे आरोग्य चांगले रहाते व रोग प्रतिकार शक्ती वाढते.
संचारबंदी काळात दुध, ब्रेड, अंडी, मांस या जीवनावश्यक बाबी असल्याने त्यांची वाहतूक व विक्री यांना प्रतिबंधक यादीतून वगळण्यात आलेले आहे. याविषयी काही अडचणी उद्भवल्यास पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग यांचेशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२८८५५११) किंवा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन फरकाळे यांचेशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३२०७०७०) संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
दुग्धप्रक्रिया केंद्रांमध्ये लागणाऱ्या आवश्यक कच्चा माल जसे डाय, स्टॅबलायझर, प्रिझरवेटीव्ह, फ्लेवर, फॅट, पॅकींग मटेरीयल, खाण्याचे रंग इत्यादींचा पुरवठा सुरळीत सुरु राहील याकडे शासनाचा दुग्धव्यवसाय विभाग लक्ष पुरवित आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थ यांचा खरेदी व विक्री संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास दुग्ध आयुक्त श्री. पोयाम यांचेशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९८८१९४४१५९) संपर्क साधता येईल.
कोरोनाविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत शासनाने घरी राहण्याच्या सुचना दिल्या असल्याने नागरिकांनी प्रोटीनयुक्त आहार घ्यावा, प्रतिकार शक्ती वाढवावी व निरोगी रहावे, असेही आवाहन श्री. केदार यांनी केले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours