मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलिसांची मोठी भूमिका आहे. सुरक्षा राखण्यापासून ते गरिबांना धान्य पोहोचविण्यापर्यंत अशी अनेक कामं पोलिसांना करावी लागत आहे. त्यात परप्रांतिय मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्याने गर्दीला हटवितांना पोलिसांवर ताण येतोय. कायम लोकांच्या संपर्कात राहिल्याने मुंबईतल्या आणखी 54 पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झालीय. त्यांच्या संपर्कात आलेल्या 54 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे सर्व जण जे जे पोलीस स्टेशनचे पीएसआय आणि पीआय दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे जे जे पोलीस स्टेशन सॅनिटाईज करण्यात आलं आहे.
दरम्यान,  देशात कोरोनाचा प्रसार वाढत असताना सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे. यावर कठोर निर्णय घेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा असे आदेश मुख्यमंत्र्याकडून देण्यात आले आहेत. राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे अशा सूचना सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अर्थचक्रही सुरू राहिलं पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असं नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कसं येतील ते पाहावं असं मुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांना बजावण्यात आलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील यात कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचं काही शहरांमधील दृश्य गंभीर होतं. पोलीस आणि प्रशासनाने गर्दीही होणार नाही आणि सूरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours