सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाबधितांचा आकडा वाढत जातोय. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. मात्र कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांच्या सोयीसाठी सर्व खासगी हॉस्पिटल, नर्सिंग होम सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही काही नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. सोलापूर महानगरपालिकेने याची दखल घेत आज 28 खासगी नर्सिंग होम/हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे.
लॉकडाउनच्या कालावधीत रुग्णालय सुरू असल्याबाबत OPD आणि IPD रुग्णांच्या माहितीसह खुलासा 2 दिवसात सादर करण्याचा सूचना या नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. मुदतीत खुलासा सादर न केल्यास नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद गृहीत धरून कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले यांनी नोटीसमध्ये सांगितलं आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद असल्याच्या तक्रारी विभागास प्राप्त होत होत्या. त्यामुळे या नर्सिंग होम/हॉस्पिटलनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि महाराष्ट्र शुश्रुषागृह अधिनियम 1949 अंर्तगत नियमांचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कायद्यांचा भंग करत रुग्णालय सुरू न ठेवणाऱ्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours