पालघर: पालघर जिल्ह्यातील उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मजुरांना पुरेश्या मोबदल्यासह मुबलक रोजगार उपलब्ध होत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्ह्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर परप्रांताकडे दरवर्षी स्थलांतर होत असते. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, पिण्याला पाणी नाही अशा परिस्थितीत करायचे काय? असा मोठा प्रश्न या आदिवासी बांधवासमोर उभा आहे. कधी दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महापुर अशा अनेक नैसर्गिक संकटामुळे आर्थिक विवंचनेत असताना सध्या करोना च्या माध्यमातुन नवीन एक संकट त्याच्यासमोर उभे राहिले आहे.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठोस पाउले उचलत संपूर्ण देश लॉकडाउन केला, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केल्याने रोजगारासाठी परप्रांतात गेलेल्या मजूरांनी आपल्या घराकडचा रस्ता धरला. अनेक समस्यांना तोंड देत हे मजूर अक्षरशः पायपीट करत आपल्या गावांत दाखल झाले खरे पण आता पोटाची खळगी भरायची कशी? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे. अनेकांकडे रेशन कार्ड नसल्याने घरात धाण्याचा कणही शिल्लक नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
घराच्या बाहेर पडावे तर करोनाची भीती आणि घरात उपासमार अशा दुहेरी कात्रित हे आदिवासी मजूर सापडले असून प्रशासना कडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. शासनाने गोरगरीब जनतेला धान्य वाटप करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात सर्वसामान्यांना त्याचा लाभ आदिवासी भागात मिळालेला नाही.
केवळ धान्य वाटप करुण या गोरगरीबांच्या पोटाची खळगी भरणार नसून यासोबत तेल, मिरची, मीठ, हळद यासारख्या जीवन आवश्यक गोष्टीही देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. अनेक आदिवासींकडे रेशनकार्ड नाही,  कातकरी बांधव देखील वंचित आहेत, त्यांना रेशकार्ड नसल्याने डावलण्यात येऊ नये तर पंचनामा करून त्यांना रेशन देण्यात यावे अशी मागणी पुढे येत आहे.
रोजगारातून मिळणाऱ्या पैशामधून पुढच्या वर्षी भातशेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करावयाचे असतात परंतू सध्या हाताला रोजगार नसताना शेतीसाठी पैसा आणायचा कोठून आणि कसा? असे असंख्य प्रश्न या हातावर पोट भरणाऱ्या मजूरांसमोर आहेत. दरवर्षी जंगलात काजूच्या बिया व मोहाची फुले गोळा करत ते विकून थोडेफार पैसे त्यांना मिळतात.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours