नवी दिल्ली, 15 मे: देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी सेल्फ क्वारंटाइन केले आहे. त्यांच्या घरातील आचारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावर सेल्फ क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरातील आचारी हा 7 मेपासून रजेवर आहे. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात तो गुरुवारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. खबरदारी म्हणून न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सेल्फ क्वारंटाइन केलं आहे.
कोरोनाच्या मोठ्या उद्रेकाची भीती...
दुसरीकडे, देशातला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 80,759 वर पोहोचली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला धडकी भरली आहे. भारतासाठी आता मे आणि जून महिला निर्णयाक ठरणार आहे. गेल्या दोनच दिवसांमध्ये तब्बल 10 हजार रुग्णांची भर पडली आहे. देशातल्या 11 राज्यांमधल्या रुग्णांची संख्या एकत्रित केल्यानंतर तो आकडा 80 हजारांच्या वर गेला आहे.
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन असताना ही परिस्थिती आहे. तर जेव्हा लॉकडाऊन शिथिल केलं जाईल तेव्हा कशा प्रकारचा उद्रेक होईल, याविषयी आता तज्ज्ञ अंदाज बांधण्याचं काम करत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची विक्रमी नोंद झाली. संख्या वाढत असल्याने सरकार आणि राज्य हादरून गेलं आहे. 1602 नवे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकड्यानं हजाराचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णाची एकूण संख्या ही 27524 वर गेली आहे तर 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 1099 वर गेली आहे.
मुंबईत तब्बल 991 रुग्णांनी वाढ झाली. तर 512 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 16579 वर पोहोचली आहे. कोरोणामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 621 जणाचा मृत्यू झाला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours