मुंबई, 11 मे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होत असल्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. परंतु, 'जर बिनविरोध निवडणूक झाली नसती तर राज्याच्या कानाकोपर्‍यातून आमदारांनी एका निवडणुकीसाठी मुंबईला येणे बरे दिसले नसते. यात जीवाचा धोका तर होताच, मात्र लोकांना काय तोंड द्यायचे हा प्रश्नसुद्धा होताच. लोकांनी कामधंदे सोडून कडीकुलूपात घरी बसायचे आणि निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचे, असे घडणे योग्य नव्हते' अशी बाजू शिवसेनेनं आपल्या मुखपत्र सामनातून मांडली आहे.
‘कोरोना’ काळात या निवडणुका बिनविरोध होतील काय? यावर काँग्रेसच्या भूमिकेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पण काँग्रेसने ‘दहावा’ उमेदवार दिल्याने निवडणुकीचे थंड पडलेले पडघम वाजवायला मदत झाली होती.  त्यामुळे विनाकारण उद्भवणारा वाद आधीच शांत झाला. भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार आहेत. त्यांचे तीन उमेदवार प्रत्येकी 29 मतांच्या गणितानुसार सहज निवडून येतील, पण त्यांनी चार उमेदवार रिंगणात उतरवले. ”आमच्याकडे चौथ्या उमेदवाराच्या विजयासाठी लागणारा आकडा आहे,” असे या फाकड्यांनी जाहीर केले. आता हा आकडा ते कोठून व कसा लावणार ते त्यांनाच माहीत, पण निवडणुकांचा घोडेबाजार  करायचा व त्यासाठी जनतेला ओझ्याचे गाढव करायचे हे एकदा पक्के केल्यावर अशा सोयीच्या राजकारणास ‘दूरदृष्टी’ वगैरे ठरवून मोकळे व्हायचे इतकेच आपल्या हातात आहे' असं म्हणत आशिष शेलार यांच्यावर सडकून टीका करण्यात आली.
कोरोनासारख्या कठीण काळात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकत्र बसून बिनविरोध कसे काय करता येईल हे सामोपचाराने ठरवावे, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र, राजकारणात अनेकदा सामोपचाराचा दुसरा अर्थ, ‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही. माघारीचा सामोपचार समोरच्याने पाळावा’ असा घेतला जातो. सुदैवाने महाराष्ट्रात असा अटीतटीचा प्रसंग उद्भवला नाही.  पण सत्तेच्या राजकारणात राजकीय अटीतटीचे प्रसंग अनेकदा येत असतात. त्यावर सामोपचाराने मार्ग निघाला तर सगळे सुरळीत होते. राज्य कोरोना काळात अस्थिर होऊ नये हाच या निवडणुकीमागचा हेतू आहे. त्यामुळे ‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हीत हेच महत्त्वाचे होते' असं म्हणत भाजपवर टीका करण्यात आली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours