मुंबई, 11 मे : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या सहाव्या उमेदवारामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांसह सर्वच उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी आज महाविकास आघाडीचे 5 उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रविवारीच महाविकास आघाडीचा तिढा सुटल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होत आहे हे स्पष्ट झालं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊ नये, आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 21 मे रोजी मतदानाची तारीख आहे.
पण त्याच पूर्वीच विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीचे 5 आणि भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार रिंगणात असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग सर्व उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करेल.
या निवडणुकीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सद्स्य बनणार असल्यामुळे, महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता आता स्थिर राहणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours