मुंबई : प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा भींतीला पाठ लागते आणि उसळायची उर्मी हवी असते, उसळायची प्रेरणा हवी असते तेव्हा तेव्हा आपण स्वत:ला संभाजी महाराजांच्या चरित्राला को-रिलेट करु शकतो, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीराजे या मालिकेद्वारे महाराजांची भूमिका करत लोकांच्या घराघरात आणि मनात पोहोचलेले डॉ. अमोल कोल्हे हे एबीपी माझाचा लोकप्रिय कार्यक्रम 'माझा कट्टा' वर आले होते. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या विशेष कट्ट्याचे आयोजन करण्यात आले.  यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भरभरुन संवाद साधला. छत्रपती संभाजी साकारतानाच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या.

आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण एक आदर्श म्हणून काढतो. मला वाटतं छत्रपती संभाजी महाराज खूप जास्त नशीबवान होते, कारण त्यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता, असं डॉ. अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

संभाजीराजांची संपूर्ण कारकीर्द ही संकटांची एक मालिका होती. आज जागतिक संकटाला सामोरे जात असताना आपण ज्या धूसर परिस्थितीचा सामना आपण करतोय, तशी परिस्थिती महाराजांसमोर देखील आली होती. काही परिस्थितींमध्ये महाराजांनी जो संयम दाखवला होता तो आपण आज लक्षात घेणे गरजेचे आहे. आज आपल्याला तो संयम राखणे गरजेचे आहे.

ऐतिहासिक कलाकृती वारंवार होणं गरजेचं आहे. इतिहासाकडे साक्षेपी दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे.  इतिहासाचा अभिमान जरुर असावा मात्र अभिनिवेश नसावा. कारण इतिहासात अनेक प्रेरणा आहेत. याकडे आपण जर तर्कशुद्ध भावनेनं बघितलं तर या इतिहासाच्या प्रेरणा आपल्याला दीर्घकाळासाठी उपयोगाच्या आहेत.

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना डावललं जाण्याची भावना होती. तरुणाईचा कल अॅंग्री यन मॅनकडे जास्त असतो. आणि छत्रपती संभाजीराजे हे अॅंग्री यंग मॅन होते. त्यामुळं छत्रपती संभाजीराजे मालिकेला तरुणाईने डोक्यावर घेतले. ही गोष्ट फार महत्वाची होती.

डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका हा एक मापदंड आहे, असंही डॉ. कोल्हे यावेळी म्हणाले. मात्र काशिनाथ घाणेकर यांच्या नाटकाला जसे हाऊसफुलचे बोर्ड लागलेले असायचे तसे बोर्ड आता लागत नाहीत, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours