मुंबई: मुंबईत कोरोनाव्हायरसचा विळखा आवळत आहे आणि धारावीसारखा झोपडपट्टीचा भाग मुंबईचाच नाही तर देशाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अशा वेळी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय झाला आणि आता या महाकाय शहराला कोरोना संकटापासून वाचवण्याची जबाबदारी इक्बालसिंग चहल या अधिकाऱ्यावर येऊन पडली आहे. मुंबईचे नवे आयुक्त म्हणून इक्बाल चहल यांनी जबाबदारी स्वीकारली.
मुंबईच्या आयुक्तपदावरून प्रवीणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय तडकाफडकी घेण्यात आला. शहरात कोरोनाव्हायरसचा फैलाव आटोक्या ठेवता न आल्याने हे प्रशासकी बदल केल्याचं सांगितलं जात आहे. परदेशी हे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी समजले जात असत. त्यांच्याकडे आता नगरविकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी असणार आहे.
प्रवीण परदेशींच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बाल चहल यांनी यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना आशियातल्या या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कानाकोपरा माहिती आहे. या अनुभवाचा वापर कोरोनाला रोखण्यासाठी होऊ शकतो.
धारावीत सध्या कोरोनाचा प्रसार वेगाने होतो आहे. दाटीवाटीची वस्ती, एका घरात अनेकांचा वावर, सार्वजनिक स्वच्छतागृह या रचनेमुळे धारावीत कोरोनाचा धोका वाढतो आहे. आता धारावीचा विशेष अभ्यास असणारा अधिकारी मुंबईच्या आयुक्तपदी आल्यानंतर परिस्थितीत फरक पडू शकतो.
इक्बाल सिंग चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते नियमितपणे मॅराथॉनमध्ये सहभागी होतात आणि ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण करतात. एक धडाडीचा आणि फिट अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. यापूर्वी इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. नगरविकास खात्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांची कामगिरी चांगली मानली जाते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours