जालना 07 मे: जालन्यात सहा दिवसांपूर्वी पोझिटिव्ह आढळून आलेले राज्य राखीव दलाचे ते दोन्ही जवान मालेगाव बंदोबस्तावरून पळून आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून त्यांच्याविरोधात सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस जवान हे अतिशय धाडसीपणे कोरोनाविरुद्ध आघाडीवर लढत आहेत मात्र या जवानांच्या या कृत्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
जालना जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतांनाच सहा दिवसांपूर्वी अचानक जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या पाचपैकी चार रुग्ण हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 मधील जवान होते.  ते जवान मालेगाव येथे बंदोबस्तावरुन परतलेले होते. त्यापैकी 2 जवान हे मालेगाव येथे बंदोबस्त ड्युटीवरून कोणालाही न सांगता पळून परस्पर जालन्यात परतल्याचं उघड झालं.
याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाचे निरीक्षक जगताप यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे. या जवानांची कृती ही अतिशय धक्कादायक समजली जाते.
राज्य आणि मुंबईमधली रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतली रुग्ण संख्या वाढत असल्याने आता डॉक्टर्स कमी पडत आहेत. क्रिटिकल पेशंट्ससाठी बेडही कमी पडत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईत संरक्षण विभागाकडे काही ICU बेड आहेत, डॉक्टर्स आहेत ते त्यांनी दिले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र तो पर्याय हा शेवटचा ठेवा असं लष्कराच्या डॉक्टर्सनी सांगितलं असंही ते म्हणाले.
राज्यात आज 1233 नवीन रूग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 16758 एवढी झाली आहे. तर आज 34 मृत्यू झालेत. तर मुंबई महापालिका हद्दीत दहा हजार टप्पा पार पडला. मुंबईत एकुण रुग्णसंख्या तब्बल 10714 एवढी झालीय. तर आतापर्यंत 412 जणांचा मृत्यू झाला. आज 275 जणांना डिस्चार्ज मिळाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours