सिंधुदुर्ग 5 जून: लॉकडाउनमुळे मुंबई आणि पुण्यातले लोक आपापल्या गावाकडे परत आलेत.  मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांचा लोंढा प्रचंड  वाढला. नंतर या येणाऱ्या चाकरमाण्यांमुळे कोरोना होतो अशी भीती निर्माण झाल्याने लोकांनी त्यांच्या विरुद्ध ओरड सुरू केली. मात्र मुंबईतून कोकणात परतलेल्या अशाच दोन चाकरमाण्यांनी आपल्या वाडीचं 30 वर्षांपासून रखडलेलं काम पूर्ण केलं.
गावातच अडकलेल्या दोन मुंबईकरानी ठरवलं की , गेल्या कित्येक वर्षापासून दळणवळणाच्या सुविधे अभावी दरवर्षीच्या पावसाळ्यात एकमेकांपासून वेगळ्या पडणाऱ्या दोन वाड्या जोडायच्या. म्हणून मग त्यानी गावातल्याच फुटलेल्या जुन्या बंधाऱ्यातील मोडकं तोडकं सामान गोळा केलं आणि कल्पकतेने  या दोन वाड्यांना जोडणारा साकव तयार केला! यामुळे माणसं तर जोडली गेलीच शिवाय गेली तीस वर्षे बंद पडलेली गाककऱ्यांची शेतीही यंदापासून पुन्हा सुरु झालीय. लोकांच्या मदतीने त्यांनी जवळपास 10 दिवसांमध्ये हे काम  करून दाखवलं.
मुंबईला उच्च शिक्षण खात्यात काम करणारे महेंद्र उर्फ भाई दुखंडे आणि त्यांचे मित्र मंगेश सावंत वीस मार्चला सिंधुदुर्गातल्या आपल्या कुंभवडे गावी आले. 22 मार्चला जनता कर्फ्यू लागला आणि पुढे लगेचच लॉकडाउन सुरु झालं. या दोघानाही शेतीची ओढ. पण ज्या वाडीत यांची शेती आहे त्या वाडीत जायचं तर एक मोठा ओढा पार करुन जायला लागायचं. ते शक्य नसल्यामुळे या दोघांसारखीच शेती असणाऱ्या आणखीही काही जणानी गेली तीस वर्षे शेतीच करणं सोडून दिलं होतं.
धो धो पाणी असलेल्या ओढ्यातून बैल आणि माणसं जाणार कशी ? किती वेळा जीव धोक्यात घालायचा ? चार चार दिवस ओढ्याचं पाणी ओसरेपर्यंत पलिकडे अडकलेल्या लोकांना अलिकडून भाकरी चटणी द्यायची तर ती एका पिशवीत बांधून त्यांच्याकडे भिरकावी लागायची. अशा स्थितीत काय करायचं हा प्रश्न या दोघानाही पडला आणि मग त्यानी या दोन वाड्याना जोडणारा साकव तयार करायच काम हाती घेतलं.
कोकणात पाणी अडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत गावागावात अनेक ठिकाणी कोल्हापूर टाईपचे केटी बंधारे बांधण्यात आलेयत . पण इथलेव भौगोलिक परिस्थिती पाहता हे सर्व बंधारे निरुपयोगी ठरले. या बंधाऱ्यांच्या वाहून आलेल्या प्लेट्स या दोघानी गोळा केल्या. मोडके तोडके लोखंडी रॉड्स गोळा केले , गावातल्या मोऱ्या बांधून शिल्लक उरलेले सिमेंट पाईपचे दोन तुकडे आणले आणि कल्पकतेने दहा दिवसात चाळीस फूटी साकव उभारला.
किरलांची वाडी ते आंब्याचा बुरुट या दोन भागाना जोडणाऱ्या या साकवामुळे आता आंब्याचा बुरुट भागात शेती असणाऱ्याना शेती करता येणे शक्य झालय. त्यामुळे गेली कित्येक वर्षे पड असलेली शेतजमीन आता लागवडीखाली येण्यास सुरुवात  झालीय . जनावरांच्या गोठ्यात पुन्हा  जनावराना आणता येणं शक्य झालय.
मुंबईकर चाकरमान्याचं गावाशी नातं कसं असतं हे भाई दुखंडे आणि मंगेश सावंत यानी दाखवून दिलय . या दोघानी उभारलेल्या या साकवामुळे दळणवळण तर सोयीचं झालंच, शिवाय माणसं ही जोडली गेलीयत . लॉकडाउनने  माणसाला पुन्हा एकदा माणुसकीने जगायचं कसं ते शिकवलय.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours