मुंबई : संगीतकार वाजिद खान यांच्यानंतर बॉलिवूडमधील आणखी एका व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. निर्माते अनिल सुरी यांचं कोविड-19 मुळे मुंबईत निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. एबीपी न्यूजने अनिल सुरी यांचं बंधू राजीव सुरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की, "2 जून रोजी ताप आल्यानंतर अनिल सुरी यांची प्रकृती खालावली होती. अशा अवस्थेत त्यांना लिलावती आणि हिंदूजा रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु बेड नसल्याचं कारण देत दोन्ही रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला."

यानंतर आम्ही त्यांना विले पार्लेमधील अॅडवान्स्ड मल्टिकेअर रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे त्यांच्या कोविड-19 सह अनेक चाचण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि काही वेळाने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांचं कोविड-19 आणि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, असं राजीव सुरी यांनी पुढे सांगितलं.

लिलावती आणि हिंदूजा या रुग्णालयांनी अनिल सूरी यांना दाखल करुन घेतलं नाही, असा राजीव सुरींचा आरोप आहे. याबाबत एबीपी न्यूजने दोन्ही रुग्णालयांशी संपर्क साधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोन्ही रुग्णालयांकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही.

कर्मयोगी आणि राज तिलक यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अनिल सूरी यांनी ऐंशीच्या दशकात में राजेश खन्ना, फराह, जीतेंद्र आणि सदाशिव अमरापूरकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बेगुनाह' नावाच्या चित्रपटाचीही निर्मिती केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन राम माहेश्वरी यांनी केलं होतं. परंतु हा चित्रपट पूर्ण होऊनही कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही.

दरम्यान अनिल सुरी यांचे बंधू राजीव सुरी हे अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मंजिल' चित्रपटाचे सहनिर्माता होते. राजीव सुरी यांनी बासु दा आणि भाऊ अनिल सुरी यांचं एकाच दिवशी झालेलं निधन हा विचित्र योगायोग असल्याचं म्हटलं. "एकाच दिवशी दोन जवळच्या व्यक्ती जाण्याचं दु:ख कायम मनात राहिल," असं ते म्हणाले. बासू चॅटर्जी यांचं 4 जून रोजी निधन झालं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours