मुंबई : जगभरात कोरोनानं धुमाकुळ घातलाय. भारतात देखील कोरोनाबाधितांचा आकडा तीन लाखांवर गेला आहे. कोरोनावर जगभरात लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत अनेकांनी औषध सापडल्याचा दावा केला आहे. यात आता योगगुरु रामदेव बाबांची देखील भर पडली आहे. कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. या औषधानं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबांनी केला आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केलाय. हा संपूर्ण कट्टा आज रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.

रामदेव बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्या औषधाची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. काही दिवसातच त्यांच्या मानवी चाचणीचेही निकाल हाती येतील. पण रुग्णांची रिकव्हरी मोठी आहे बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनासाठी 500 वैज्ञानिकांची मोठी टीम आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर वेगवेगळ्या रोगांवर औषध शोधण्याचं प्रमाण सातत्यानं पतंजली करतेय, असं रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

रामदेव बाबा म्हणाले की, कोरोनावर श्वासारी हे आमचं मुख्य औषध आहे जे आम्ही कोरोनाला आळा घालण्यासाठी वापरत आहोत. कोरोना झाल्यानंतर त्या व्यक्तिला ठीक करण्यासाठी हे औषध वापरलं जाऊ शकतं, असं रामदेव बाबा म्हणाले. गिलॉय धनवटी, तुलसी धनवटी आणि अश्वगंधा कॅप्सूल अशी चार औषधं मुख्यत: आहेत. याद्वारे सर्दी, ताप, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. या औषधांनी आम्ही कॉम्लिकेशन्सवर 100 टक्के मात केली आहे. कोरोना संक्रमित झाल्यानंतर तो बरा करण्यासाठी या औषधांचा वापर होईल असं रामदेव बाबांनी सांगितलं आहे.

रामदेव बाबांनी कोरोनावर मात करण्यासाठी सांगितलेल्या औषधांसह रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, कोरोनाकाळात करण्याचे योगासह अनेक मुद्द्यांवर माहिती दिली आहे. रामदेव बाबांशी झालेल्या या संपूर्ण गप्पा आज रात्री 9 वाजता माझा कट्टा कार्यक्रमाद्वारे प्रसारित होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours