मुंबई : राज्याला कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात 3493 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 1 लाख 1 हजार 141 वर गेला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या  3717वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त  90 जणांचा मृत्यू झाला.  दिवसभरात 1718 रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण 47796 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 47.3 एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेले काही दिवस राज्यात 3 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता पावसाळ्याची सुरूवात होणार असल्याने पुन्हा इतर साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.

दरम्यान,  जुलै आणि ऑगस्टमध्ये हा कोरोना रुग्णांचा संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हाच धोका ओळखून मुंबई आणि दिल्लीतल्या बड्या सोसायट्यांनी आता पुढाकार घेत आपल्याच परिसरात आरोग्य सुविधा उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours