मुंबई: राज्यात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून ऑनलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र त्याला कडाडून विरोध सुरू होत असतानाच आज शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार नववी, दहावी आणि बारावीची प्रत्यक्ष शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू केले जाणार आहेत. सहावी ते आठवीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरवले जाणार आहेत. मुख्य म्हणजे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत त्याच भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांची सुरुवात सप्टेंबर महिन्यापासून होणार आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रत्यक्ष वर्गाचा निर्णय घेतला जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने आज जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच आवश्यकतेनुसार नवीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने किंवा शाळेत गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours