विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा, दि. २६ नोव्हेंबर:- 

श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ व्या समाधी संजीवनी सोहळ्याचे औचित्य साधून भंडारा शहरातील सर्व वारकरी व संत समाजातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.     यानिमित्त २९ व ३० नोव्हेंबर रोजी निबंध स्पर्धा तर २ डिसेंबर रोजी भव्य संत दिंडी काढण्यात येईल. ही दिंडी बहिरंगेश्वर देवस्थान मंदिर परिसर खांबतलाव भंडारा येथून श्री संत बालकदासजी महाराज आश्रम धर्मापुरी येथे जाणार आहे. 

    नागरिकांनी सहपरिवार या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन सकल संत समाजाच्या वतीने दिंडी कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष रमाकांत पशिने यांनी पत्रपरिषदेत केले. संपूर्ण उपक्रमाविषयी माहिती देण्याकरिता आज २६ नोव्हेंबर रोजी भंडारा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

     महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व परमार्थाच्या क्षेत्रात सर्व पिढ्यामधील समाजवर्गाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनमंदिरात एक अढळस्थान म्हणून जपले ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज.  अशा थोर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी संजीवनी सोहळ्याचे यंदा ७२५ वे वर्ष आहे. हा संजीवनी समाधी सोहळा भंडारा शहरातील सर्व वारकरी वसंत समाजातर्फे भव्यदिव्यरित्या साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेची व संतांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी याकरिता शहरातील विविध शाळांमध्ये २९ व ३० नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्रातील संत’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. इयत्ता ५ ते ७ वी आणि इयत्ता ८ ते १० वी अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही एका संताविषयी विद्यार्थ्यांनी घरीच निबंध लिहून शाळेमध्ये सादर करावयाचा आहे. विशेष म्हणजे या निबंधाकरिता शब्द मर्यादेचे बंद नाही. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. तसेच समाधी संजीवनी सोहळानिमित्त गुरुवार २ डिसेंबर रोजी भव्य दिंडी काढण्यात येणार आहे. भंडारा शहरातील खांबतलाव येथील बहिरंगेश्वर मंदीर ते तालुक्यातील धर्मापुरी येथील श्री संत बालकदास महाराज आश्रमपर्यंत ही दिंडी राहणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता विठ्ठल रुखमाई मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पादुका यात्रा निघेल. यानंतर बहिरंगेश्वर मंदिर प्रांगणात पादुकापूजन, अभिषेक, गौपूजन करून दिंडी प्रस्थान करेल. पुढे खोकरला येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात दिंडीचे स्वागत, पूजन, अल्पविश्रांती होईल. यानंतर सातोना व  खात येथे नगरप्रदक्षिणा करून धर्मापुरी येथील संत बालकदास महाराजांच्या आश्रमात दिंडीचे समापन होईल. येथे गुरुभक्त प्रा. सुमंत देशपांडे यांचे कीर्तन व ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर प्रबोधन होणार आहे. गोपालकाला व महाप्रसादानंतर सायंकाळी ६.३० वाजता भंडारा प्रस्थान करण्यात येईल. दिंडीचे आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख संतांचे जिवंत चित्ररथ यात दिंडीत साकारण्यात येणार आहे, हे विशेष! या सोहळ्यानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन संत दिंडी आयोजन समितीतर्फे पत्रपरिषदेत रमाकांत पशिने यांच्यासह विजय आयलवार, दत्तात्रय वानखेडे, विकास मदनकर, प्रकाश पांडे, प्रदीप ढबाले, राकेश सेलोकर, मयूर बिसेन  यांनी केले आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours