विलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा,दि. ३० नोव्हेंबर :- भंडारा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने भरधाव पीकअप वाहनाचा पाठलाग करत ६३२ किलो ३८२ ग्राम गांजा जप्त केला आहे. सदर कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने रात्रीच्या गस्ती दरम्यान मुजबी गावा जवळ करण्यात आली.
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम हे आपल्या पथकासह शनिवारी रात्री गस्तीवर होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास ते बेला गावाजवळ असतांना बोलोरो पीकअप गाडी क्रमांक ओडी ०५/एडब्लू ९०९२ ही राष्ट्रीय महामार्गा वरील भंडारा मार्गे नागपूरच्या दिशेने संशयास्पद स्थितीत भरधाव वेगाने जाताना दिसली. वाहनावर संशय आल्याने शिवाजी कदम यांनी त्यांच्या वाहन चालकाला सदर बोलोरो पिअकप गाडीचा पाठलाग करण्याचे निर्देश दिले. पोलिसांचे वाहन पाठलाग करीत असल्याचे दिसताच पीकअपचा वेग अधिकच वाढला. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने पोलिसांनीही वेगाने पाठलाग करून मुजबी गावा जवळ ओव्हरटेक करून पीकअपला अडविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम हे त्यांच्या पथकासह गाडीतून खाली उतरताच पीकअपच्या चालकाने वाहन सोडून फरार झाला. यावेळी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, भंडा-याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व ठाणेदार सुभाष बारसे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन भंडारा पोलिस ठाण्यात आणले. यावेळी वाहनात सुमारे १७ बो-यांमध्ये जवळपास ६३२ किलो ३८२ ग्रॅम गांजा असल्याचे उघड झाले. सदर गांज्याची किंमत ६३ लाख २३ हजार ८२० रुपये असल्याचे समजते. या कारवाईत गांजा व वाहनासह ६८ लाख ३९ हजार १९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अशा या कामगिरी बद्दल पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक केले जात असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगणे करीत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours