17 एप्रिल : अहमदनगर केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घातला. याप्रकरणातील आरोपी नगरसेवक कैलास गिरवलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील ओरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक कैलास गिरवलेला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती.
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये असताना रविवारी सकाळी कैलास गिरवले यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना पुणे येथे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सोमवारी सकाळीपासून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. अखेर सोमवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, ससून रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कैलास गिरवले यांचे भाऊ बाबासाहेब गिरवले यांनी रात्री उशीरा पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
माळीवाडा परिसरातील कैलास गिरवले यांच्या कपिलेश्वर फटाके विक्रीच्या दुकानावर छापा टाकला होता. त्यात अवैध फटाके, मादक पदार्थ सापडल्याने कोतवाली पोलिसांनी कैलास गिरवले यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. कोतवाली पोलिसांनी त्यांना नाशिक येथून कोवताली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करून आणले. त्यात गिरवले यांना एक दिवसांची पोलिस कोठडीही मिळाली होती.
Post A Comment:
0 comments so far,add yours