16 मे : जेष्ठ लावणीसाम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर आता आपल्यात नाहीयेत. वयाच्या 102व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. वाईच्या खासगी रुग्णायलात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज साताऱ्यात वाई इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने लावणीच्या इतिहासातील लखलखता तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
'जिवलगा, तुम्ही माझे सावकार, शेत जमीन गहाण ठेवीते, घेते मी रोखा करुनी' अशा शब्दात फड रंगवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, पारंपरिक पद्धतीने बैठकीची घरंदाज लावणी गाणाऱ्या एकमेव गायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर अशी त्यांची ओळख.
यमुनाबाई वाईच्या कोल्हाटी समाजाच्या वस्तीत राहत होत्या. ही वस्ती म्हणजे एक लोककलेचं माहेरच होतं. यमुना, तारा, हिरा या तीन बहिणी. आईचं नाव गीताबाई. त्याही गायच्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून डोंबारी खेळातून पोट भरता भरताच यमुनाबाई वाईकरांनी गाणं गायला सुरुवात केली. त्यांना आईकडूनच गाण्याचा वारसा मिळाला. त्याच त्यांच्या पहिल्या गुरू ठरल्या.
त्यानंतर त्या 'रंगू आणि गंगू' फडावर दाखल झाल्या. तिथे त्या ठेका आणि नाचणं शिकल्या. नंतर वाईला परत आल्यावर 'यमुना हिरा तारा संगीत पार्टी'ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या कलेची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं.
त्यांना टागोर अ‍ॅकॅडमीचा जीवन गौरव, माणिक वर्मा प्रतिष्ठान, संगीत अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा लावणी सम्राज्ञी पुरस्कार, जागतिक मराठी परिषद, पहिला लोकरंगभूमी पुरस्कार, वसुंधरा पंडित पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours