बंगळुरू,ता.19 मे: जनता दल धर्मनिरपेक्षच्या विधिमंडळ पक्षाचे नेते एच.डी.कुमारस्वामी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर कुमारस्वामींचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. विधानसभेचं कामकाज झाल्यानंतर कुमारस्वामींनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली.
त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केलं. काँग्रेसचे नेते जी. परमेश्वरा यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि जेडीएसनं पहिली लढाई जिंकली असली तरी मंत्रिमंडळ बनवणं आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात करण्यासाठी या दोन्ही पक्षांना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे.
कुमारस्वामी यांचं राजकारण बेभरवशाचं असल्यानं काँग्रेसलाही सावध पावलं टाकावी लागणार आहेत. मात्र भाजपचं मोठं आव्हान आणि सत्तपासून अनेक वर्ष दूर लागलं असल्यानं त्यांच्या राजकारणात आता मोठे बदल झाले असं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलंय.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांच्यासह विरोधपक्षांच्या अनेक नेत्यांनी कुमारस्वामींचं फोन करून अभिनंदन केलं तर कुमारस्वामींनी त्यांना सोमवारच्या शपथविधी समारंभाला येण्याचं निमंत्रण दिलं. आता सोमवारपासून कर्नाटकात तिसऱ्या राजकीय नाट्याला सुरवात होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours