रिपोर्टर-हर्षिता ठवकर

वरठी : मागील चार दिवसांपासून वरठीत जलशुद्धीकरण केंद्रावर दुरूस्तीचे काम जोमाने सुरू असले तरी दूषीत पाणी पुरवठा सुरूच आहे. अनियमित व दूषित पाणी पुरठ्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, गुरूवारला दुपारी गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करीत दूषित पाण्याच्या मुद्दा उपस्थित केला. यावर तोडगा न निघाल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
एक महिन्यापासून नळाला दूषित पाणी पुरवठा सुरु आहे. दूषित पाणी पुरवठ्याबाबत कुणी विचारपुस केली तर ग्रामपंचायतमधून परत पाठविण्यात येते. गतवर्षी नदी पात्रातील जलसाठा घटल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी माजी सरपंच संजय मिरासे यांच्यावर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. नदीपात्रात जलसाठा नसल्यामुळे पाणी पुरवठा खंडित होणे स्वाभाविक होते. परंतु मुबलक पाणी असताना पाणी टंचाई उदभवल्याने गावात तीव्र असंतोष आहे.
जल शुद्धीकरण यंत्रात आलेला बिघाड हा तांत्रिक नसून पंचायतीच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. जल शुद्धीकरण यंत्रात प्रमाणित साहित्य न वापरल्यामुळे दूषित पाणी पिण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यामुळे आजारी होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस नागरिकाचे पाण्यासाठी बेहाल होत असल्याने आज गुरूवारला काही तरूणांनी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला. यावेळी किशोर मारवाडे, अश्विन मेश्राम, प्रदीप भालाधरे, शुभम तिरपुडे भुपेश शहारे, पंकज वासनिक, निशांत गजभिये उपस्थित होते. पाण्याविषयी चर्चा करण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित नसल्याने पुन्हा हल्लाबोल आंदोलन करण्याचे या तरूणांनी बोलून दाखविले आहे. यावेळी उपसरपंच सुमित पाटील व ग्रामपंचायत सदस्य संघदीप उके यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली.
पाणी वाटपात भेदभाव
नव्याने सत्तेत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याची जबाबदारी घेणाºया एका पदाधिकाऱ्याने काही सदस्यांना हाताशी धरून पाणी वाटपात भेदभाव करीत असल्याचा आरोप होत आहे .सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी हेतुपरस्पर अनेक भागातील पाणी वाटपाचे वेळापत्रक बदलून पाणी पुरवठा करण्याची वेळ कमी करण्यात आली आहे. एकाच भागात अनेकवेळा नळाला पाणी देण्यात येते तर काही भागातील नागरिकांचा पारी पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप होत आहे.
वेळापत्रक नसल्याने घोळ
अनेक वर्षांपासून पाणी वाटपाचे वेळापत्रक सुरळीत होते. सद्यस्थितीत सुरु असलेल्या कारभारामुळे पाणी वाटपात घोळ निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक नियोजित नसल्याने विविध प्रश्न निर्माण होत आहेत. नळ येण्याची निर्धारित वेळ माहिती नसल्याने अनेकांना नळाचे पाणी नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours